रायगड - अर्णब गोस्वामी यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रायगड पोलिसांनी जिल्हा न्यायालयाचे पहिले तदर्थ न्यायाधीश आर. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात 5 नोव्हेबर रोजी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी आता 9 नोव्हेंबरला होणार आहे.
आरोपींची मागणी फेटाळली
आरोपी नितेश सरडा यांच्या वकिलांनी इंग्लिशमध्ये रिव्हिजन कॉपीची मागणी केली होती. मात्र आजच्या सुनावणीत त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर तिन्ही आरोपींच्या वकिलांनी सुनावणी स्थगित करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावर युक्तिवाद झाल्यावर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता ही सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे.
तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी
रायगड पोलिसांनी 4 नोव्हेंबरला अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांना अटक केली होती. सत्र न्यायालयात तिघांना हजर केले असता न्यायाधीश सुनयना पिगळे यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत रायगड पोलिसांनी न्यायालयीन कोठडीबाबत पुनर्विचार याचिका न्यायाधीश आर. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात दाखल केली होती
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण..
अन्वय नाईक यांचा मुंबई येथे इंटिरेअर डिझाईनिंग व्यवसाय होता. या व्यवसायातील उधारी वसूल न झाल्याने नाईक यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. याला कंटाळून 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यात कावीर या गावातील आपल्या घरी गळफास घेऊन अन्वय नाईक यांनी आई कुमुद नाईक हिच्यासह आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्याचा आरोप अन्वय नाईकने केला होता.