रायगड - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले अर्णब गोस्वामी, नितेश सरडा आणि फिरोज शेख याची केस सध्या गाजत आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज काल फेटाळला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या सुनावणीवर आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. मलशेट्टी यांच्या समोर आज रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीकडे लक्ष -
जिल्हा सत्र न्यायालयात आज पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. काल आरोपी पक्षातर्फे नितेश सरडा याच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला आहे. यामध्ये पुनर्विचार याचिका ही मेंटेनेबल आहे का, याबाबत युक्तीवाद झाला. यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आज अर्णब गोस्वामी आणि फिरोज शेख यांच्या वकिलांचा युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर पुनर्विचार याचिकेवर न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी फेटाळली -
आरोपी पक्षातर्फे पुनर्विचार याचिका आणि जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याबाबत काल मागणी झाली होती. या मागणीला सरकारी पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. आरोपीच्या वकिलांनी केलेली ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे जामीन अर्जाच्या सुनावणी अगोदर पुनर्विचार याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिल्यास अर्णब गोस्वामीच्या अडचणीत वाढ होऊन पोलीस कस्टडी मिळण्याची दाट शक्यता आहे.
काय आहे प्रकरण -
अर्णब गोस्वामी यांनी पैसे दिले नाही म्हणून अन्वय नाईक या आर्किटेकने 2018 मध्ये आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या आईनेही आत्महत्या केली होती. नाईक यांनी आत्महत्या करताना रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे नाव चिट्ठीमध्ये लिहून ठेवले होते. त्यानंतरही अर्णब यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप नाईक यांच्या पत्नी व मुलीने केला होता. त्यानुसार सीआयडी चौकशी करून अर्णबला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.