रायगड - पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यासाठी आजोबांनी बंदुकीचा नेम धरला. मात्र आजोबांचा नेम चुकला आणि नातवाच्या कमरेला गोळी चाटून गेली. या घटनेत नातू हा गंभीर जखमी झाला आहे. महाड तालुक्यातील कोकरे येथे ही घटना घडली. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आजोबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविराज अनंत साळवी असे जखमी तरुणाचे नाव आहे.
नेम चुकला आणि नातू जखमी झाला -
महाड तालुक्यातील कोकरे गावात एक पिसाळलेला कुत्रा ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले. मात्र कुत्रा हा बचावला आहे. अखेर कोकरे गावातील सेवानिवृत्त सैनिक असलेले यशवंत साळवी (वय ७५) यांनी या कुत्र्याला मारण्यासाठी आपली नळीची बंदूक सरसावली. कुत्र्यावर बंदुकीने नेम धरला मात्र कुत्रा पसार होऊन बाजूला असलेला यशवंत साळवी यांचा नातू कविराज अनंत साळवी (वय ३१ ) याच्या कमरेला बंदुकीतून सुटलेली गोळी घासून गेली. या दुर्घटनेत नातू कविराज हा गंभीर जखमी झाला. कविराज याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
आजोबानी कुत्र्याला मारलेली गोळी चुकून नातू जखमी झाला. ही घटना पोलिसांना कळताच महाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आजोबा विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजोबांची काहीही चूक नाही -
पिसाळलेल्या कुत्र्याला मारण्यासाठी आजोबांनी बंदुकीतून गोळी मारली. मात्र चुकून ती गोळी मला लागली. यात आजोबांची काही चूक नाही असे जखमी कविराज साळवी याने प्रतिक्रिया दिली आहे.