रायगड - गोवा राज्याच्या धर्तीवर जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसोली आणि श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी 1 सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्वावर शॅक्स हॉटेल सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने मंजूर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वरसोली आणि दिवेआगर समुद्रकिनारी आता पर्यटकांची रेलचेल वाढणार असून स्थानिक व्यवसायिक तसेच बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार यानिमित्ताने राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत कोकणात पर्यटन वाढीसाठी शासनाने पावले उचलली आहेत. गोवा राज्यात समुद्रकिनारी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शॅक्स प्रकल्प कार्यन्वित केला आहे. त्याच धर्तीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही शासनाने प्रायोगिक तत्वावर शॅक प्रकल्प कार्यन्वित करण्यास परवानगी दिली आहे. रायगडात वरसोली आणि दिवेआगर या दोन समुद्रकिनारी हा प्रकल्प पहिला कार्यन्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापासूनच या संकल्पनेबाबत नागरिकांमध्ये तसेच पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा... "बिहार रेजिमेंटने शौर्य गाजवले.. मग इतर रेजिमेंट काय तंबाखू चोळत होत्या का?"
जिल्ह्यात अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारे हे पर्यटकांची मुख्य आकर्षणे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या तालुक्यातील समुद्र किनारे हे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेली असतात. जिल्ह्यातील वरसोली, दिवेआगर समुद्रकिनारे हे सुरुच्या बनाने व्यापलेला असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. समुद्रकिनारी असलेल्या बोटिंग, घोडागाडी, उंटसवारी, पराग्लायडिंग याचा आनंद पर्यटकांना याठिकाणी मिळत असतो. त्यात आता शासनाने शॅक्स प्रकल्प कार्यन्वित करण्यास परवानगी दिल्याने याठिकाणच्या पर्यटनाला चार चांद लागणार आहेत.
वरसोली आणि दिवेआगर समुद्रकिनारी 15×15 आणि 12 फूट उंच 20 ×15 चे छत अशा 10 शॅक्स पर्यटकांच्या बसण्यासाठी बांधण्यात येणार आहेत. याठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार असून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यत पर्यटकांना याचा वापर करता येणार आहे. या शॅक्स भाडेतत्वावर घेण्यासाठी 15 हजार नॉन इफंडेबल फी आणि 30 हजार डिपॉझिट शासनाला द्यावे लागणार आहे. तर शासनाला पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार तर अंतिम वर्षाला 55 हजार वार्षिक शुल्क द्यावे लागणार आहे. 80 टक्के स्थानिकांना हे शॅक द्यायचे आहेत.
हेही वाचा... 'जातीय तेढ नष्ट करणे आणि सर्वांना शिक्षण देणे, हीच छत्रपती शाहू महाराजांना खरी आदरांजली'
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून आम्हाला ही संधी राज्य शासनाने दिल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याने वरसोली, दिवेआगर परिसराचा कायापालट होणार असून स्थानिकांचे आर्थिक स्तर वाढला जाणार आहे. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, असे मत वरसोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सद्सय आणि माजी सरपंच मिलिंद कावळे यांनी व्यक्त केले आहे.
वरसोली समुद्रकिनारी पूर्वी सुट्टीच्या दिवशी पर्यटक येत असत. मात्र गोवा राज्यसरखी सुविधा वरसोली, दिवेआगर समुद्रकिनारी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक या किनाऱ्याला भेट देणार आहेत. त्यामुळे स्थानिक कॉटेज, हॉटेल व्यावसायिक तसेच त्याच्याशी निगडित व्यवसायिकांनाही आर्थिक फायदा मिळणार असल्याचे मत वरसोली ग्रामपंचायत सदस्य नम्रता वर्तक, अनुराधा राणे यांनी व्यक्त केले.