पेण (रायगड) - शेतकरी कामगार पक्षाचे पेणचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. आगामी सर्वच निवडणुकांत तालुक्यात लालबावटा पुन्हा अभिमानाने फडकवणार आहोत असा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे. ( Shekap's 75 Th anniversary ) पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा शेकाप जिंकणार असल्याचेही माजी आमदार धैर्यशील पाटील म्हणाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन वडखळ येथे 2 ऑगस्टला साजरा करण्यात येणार असून यानिमित्त पेण येथील कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते.
तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित - यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, शेकाप नेत्या ॲड. निलिमा पाटील, भाऊ एरणकर, जि. प. सदस्य डी. बी. पाटील, प्रभाकर म्हात्रे, पेण तालुका चिटणीस संजय डंगर, सुरेश खैरे, प्रसाद भोईर, सुरेश पाटील, संदेश ठाकूर, के. डी. पाटील, प्रफुल पाटील, समिर म्हात्रे, शोमर पेणकर, स्वप्निल म्हात्रे, अमित पाटील, काशिनाथ पाटील, दिलीप पाटील, संजय भोईर, मधुकर पाटील यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकापने सहभाग घेवून जनतेला न्याय मिळवून दिला - या प्रसंगी पुढे बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन अधिकाधिक ताकदीने तसेच पक्षाला उर्जित अवस्था देण्याच्या मार्गाने साजरा करणार आहोत. शेकापने नेहमीच शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या समस्या मोठ्या निष्ठेने सोडवल्या आहेत. तसेच, उरणचे आंदेलन, चरीचे आंदोलन, पेणचे सेझचे आंदोलन यामध्ये शेकापने सहभाग घेवून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. पुढील सर्व निवडणुकीत कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताच निर्णय घेतला जाणार नाही. पुन्हा एकदा तालुका पेटून उठेल, विरोधकांना आमची ताकद दाखवून देऊ असही माजी आमदार धैर्यशील पाटील यावेळी म्हणाले आहेत.
भविष्यात पक्षाला चांगले दिवस - संघटना, पक्ष मोठा असून संघटने पेक्षा कोणीही मोठा नाही. भविष्यात शेतकरी कामगार पक्षाला चांगले दिवस येणार आहेत, असे शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणिस आस्वाद पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेतला व कार्यकर्त्यांना यासंबंधी मार्गदर्शन केले.