रायगड - पेण तालुक्यातील वरसईच्या आदिवासी आश्रमशाळेतील दहावीच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर आश्रमशाळेतील दोषी आढळलेल्या तीन जणांवर निलंबनाची कारवाई प्रकल्प अधिकारी शशिकला अहीरराव यांनी केली आहे. यु. एल. पवार (शिक्षिका व प्रभारीआश्रम अधीक्षक), डी. जी. धंदंरे (निवासी अधीक्षक), डी. जी. पाटील (मुख्याध्यापक) या तीन महिला कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; नातेवाईकांनी व्यक्त केला संशय
मुलगी बुधवारी आश्रमशाळेतून निघून गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह हा जावळी जंगलात गळफास लावलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. शिल्पा ही शाळेतून निघून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन पेण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.
मुलीच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. तर या घटनेनंतर जिल्हा प्रकल्प अधिकारी शशिकला अहीरराव यांनी आश्रमशाळेतील दोषी तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. पेण पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने शाळेची तपासणी केली आहे. तिच्या आत्महत्येबाबत अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - खोपोलीत भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; बालकाच्या चेहऱ्याचा घेतला चावा