रायगड : रायगडच्या अलिबाग, नवगाव समुद्रकिनाऱ्यावर पाच मृतदेह सापडले आहेत. अलिबाग तालुक्यात शनिवारी तीन, मुरूड येथे शुक्रवारी रात्री एक आणि शनिवारी एक असे एकूण पाच मृतदेह सापडले आहेत. तौक्ते चक्रीवादळादरम्यान खोल समुद्रात बेपत्ता झालेल्या पी 305 बार्जवरील कर्मचाऱ्यांचे मृतदेह असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने माहिती संबंधितांना कळवली आहे.
पाच मृतदेह सापडले समुद्रकिनाऱ्याला
रायगडच्या अलिबाग आणि मुरुड समुद्रकिनारी हे मृतदेह लागले आहेत. अलिबाग तालुक्यातील सासावणे येथे एक, नवगव येथे दोन, मुरुड समुद्रकिनारी एक आणि अलिबाग येथील आवास समुद्रकिनारी एक असे पाच मृतदेह समुद्राच्या पाण्यात वाहून किनाऱ्याला लागले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत.
पी 305 बार्जमधील कर्मचाऱ्यांचे मृतदेह असल्याची शक्यता
तौक्ते चक्रीवादळात भर समुद्रात ओएनजीसीची पी 305 ही बार्ज अडकली होती. यात काही कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. तर 16 मृतदेह अद्यापही मिळालेले नाहीत. 16 पैकी 3 मृतदेह मुंबईत सापडले आहेत. तर अलिबाग मुरुड येथे दोन दिवसांत चार मृतदेह सापडले असून हे पी 305 बार्जमधील असल्याची शक्यता आहे. यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.