रायगड : जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून आज एकाच दिवशी 44 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून पुन्हा संचारबंदी लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अलिबाग तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. आज अलिबागमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक 44 कोरोना रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत एकूण 223 कोरोना रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 98 जणांनी कोरोनावर मात केली असून 118 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
अलिबाग तालुक्यात आज सहणगोठी 3, सुडकोली 2, कुदे 3, रायवाडी 2, नवेनगर, आरसीएफ कॉलनी कुरुळ 11, गोंधळ पाडा 4, चेंढरे 1, चोरगुंडी पोयनाड 6, आंबेपूर 1, मांडवखार 1, जिल्हा रुग्णालय वसाहत अलिबाग 1, कातळ पाडा सातिर्जे 1, वरसोली 1, नवेदर नवेगाव 1, सहणगोठी 1, मोठे शहापूर 3 असे एकूण 44 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.