रायगड - एक जूनपासून समुद्रात मासेमारी बंद होणार असल्याने कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर शाकारून (झोपडीखाली झाकून टाकणे) ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात मासेमारी करण्यास मत्स्य विभागाकडून बंदी घाल्याण्यत आली आहे. त्यामुळे आता सप्टेंबरनंतरच कोळी बांधव आपल्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात सोडणार आहेत.
पावसाळ्यात समुद्रात वादळी वातावरण असते. त्याचबरोबर माशांचा प्रजनन काळ असल्याने त्याचे जतन करणे गरजेचे असते. तसेच पावसाळ्यात वीज, वादळी वातावरण असल्याने समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे मत्स्य विभागाकडून पावसाळी वातावरणात मासेमारी करण्यास बंदी असते. नियम तोडणाऱ्या बोटींवर कारवाईही केली जाते. त्याचबरोबर पावसाळ्यात मासेमारी करताना समुद्रात एखादा अपघात झाला तर त्याची नुकसान भरपाईही शासनाकडून दिली जात नाही.
जूनपासून समुद्रात मासेमारी बंदी असल्याने कोळी बांधवांनी आपल्या बोटी समुद्र किनाऱ्यावर लावलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर शाकारून ठेवलेल्या बोटी दिसू लागलेल्या आहेत. पावसाळ्यात मच्छीमारी बंद असल्याने कोळी बांधव समुद्र किनारी लावलेल्या बोटीची डागडुजीची कामे या कालावधीत पूर्ण करून घेतात. तसेच जाळी विणण्याचे कामही यावेळी कोळी बांधव करतात. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर पासून मासेमारी सुरू झाल्यानंतर बोटी पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी सज्ज होतात.