रायगड - आज सकाळी पेण तालुक्यातील डोळवी येथील जेएसडब्लू कंपनीतुन अचानक निघत असलेल्या धुरांच्या लोळामुळे पेण व अलिबाग तालुक्यात घबराट पसरली होती. मात्र, अचानक झालेल्या कंपनीतील ब्रेकडाऊनमुळे धूर झाल्याचे जेएसडब्लू तसेच जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी अचानक जेएसडब्लू कंपनी परिसरात धुराचे लोटच्या लोट बाहेर निघत असल्याचे दिसत होते. मोठ्या प्रमाणावर निघत असलेल्या या धुरांचे लोट पाहून ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले होते. कंपनीत एखादी दुर्घटना घडल्याची चर्चा होत होती. या घटनेचे व्हिडिओ तसेच फोटो संपूर्ण जिल्हाभर समाज माध्यमावर फिरत होते. त्यामुळे अलिबाग तसेच पेण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते.
या संदर्भात पेण तहसीलदार अरुणा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला. मात्र, कंपनीत ब्रेकडाऊन झाल्यामुळे धूर पसरल्याचे सांगण्यात आले. जेएसडब्लू प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी देखील कोणतीही दुर्घटना घडली नसून ब्रेकडाऊनमुळे सदर प्रकार घडल्याचे स्पष्ट केले.