रायगड - बापानेच आपल्या १४ वर्षीय मुलीची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी (५ फेब्रुवारी) रात्री खोपोलीजवळ घडली. हत्याकरून मुलीचा बाप बिहारला निघून गेला होता. मात्र, खोपोली पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन काल रात्री आरोपी बापास अटक केली. अजय सुदर्शन सिंग असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - महाड भोर मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा
मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील अजय सिंग हा कुटुंबासह 2 फेब्रुवारीला सकाळी खोपोलीतील एका लॉजवर उतरला होता. 5 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता या कुटुंबाने अचानक लॉज सोडली. अजय सिंग (वय 48), पत्नी सुमन देवी सिंग (वय 34), मुलगी खुशी सिंग (वय 14), मुलगी प्रिया सिंग (वय 12) यांचा यात समावेश होता. लॉज सोडल्यावर अजय सिंगने सर्वांना अज्ञात स्थळी नेले व पत्नी आणि मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अजयने त्याची 14 वर्षीय मुलगी खुशी हिचा गळा कापून हत्या केली व तिचे धड झुडपात ठेवून कापलेला गळा व शीर जवळच असलेल्या पाताळगंगा नदीत टाकून दिले. हे सर्व त्याची पत्नी सुमन व दुसऱ्या मुलीने बघितले आणि त्यांनी अजयच्या ताब्यातून सुटून स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व माहिती खोपोली पोलिसांना दिली.
खोपोली पोलिसांनी तातडीने पोलीस पथक पाठवून तपास कार्य सुरू केले. दरम्यान आरोपी अजय सिंग हा बेपत्ता झाल्याचे समोर आले. मात्र, मोबाईल लोकेशन ट्रेसिंगनुसार तो बिहारमध्ये गेल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार खोपोली पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग व पथक तातडीने बिहारकडे रवाना झाले. त्यांनी काल रात्री अजय सिंग याला बिहारमधून ताब्यात घेतले.
बिहार पोलिसांशी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज रात्री उशिरा खोपोली पोलीस पथक आरोपीला घेऊन खोपोलीत दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा अगोदर खोपोली व हद्दीनुसार नंतर खालापूर पोलीस स्टेशनकडे दाखल झाला आहे. या हत्येत मुलीचे धड पोलिसांना मिळाले असून, नदीत टाकलेली मान व शीर याचा तपास खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या नेतृत्वाखाली अद्यापही सुरू आहे.
हेही वाचा - अलिबाग कारागृहाचे अधीक्षक निलंबित, अर्णब गोस्वामीला जेलमध्ये पुरवला होता मोबाईल