रायगड : महाड इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख काझी याने माणगाव जिल्हा सत्र न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर फारुक काझी याला महाड पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. महाड इमारत दुर्घटनेत आता फारुक काझी, बाहुबली धमाणे, युनूस शेख असे तीन जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
24 ऑगस्ट रोजी महाड शहरातील 'तारिक गार्डन' ही इमारत पत्त्यासारखी कोसळली होती. त्यानंतर प्रशासनाकडून तीन दिवस बचावकार्य सुरू होते. या दुर्घटनेत 16 रहिवासी मृत्यूमुखी पडले असून दोन जण सुदैवाने बचावले आहेत. इमारत दुर्घटनेनंतर बांधकाम व्यवसायिक फारुक काझी यांच्यासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपी फारुक काझी हा फरार झाला होता. महाड पोलीस त्याच्या शोधात होते.
फारुक काझी याने 31 ऑगस्ट रोजी माणगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची सुनावणी 3 सप्टेंबर रोजी न्यायालयात होणार होती. त्यानुसार फारुक काझी हा माणगाव न्यायलायत हजर झाला होता. न्यायालयात त्याने शरणागती पत्करली. त्यानंतर महाड पोलिसांनी फारुक काझी याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
हेही वाचा - माथेरान अनलॉक; साडेपाच महिन्यानंतर पर्यटकांची पुन्हा रेलचेल सुरू