रायगड - जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना टाळेबंदीत शिथिलता आजपासून देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात काही प्रमाणात तुरळक गर्दी पाहायला मिळत असली तरी आज गटारी असल्याने मटण, चिकन दुकानांवर खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी शिथिलता दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले असले तरी दुकानाची वेळ वाढविण्याची मागणीही केली आहे.
रविवार असल्याने आज गटारी सण जिल्ह्यात साजरा होणार असल्याने मटण, चिकन दुकानात ग्राहकांनी सकाळीच रांगा लावलेल्या होत्या. किराणा सामान हे नागरिकांनी आधीच भरले असल्याने तुरळक गर्दी दुकानात दिसत होती. भाजी, मासळी बाजारातही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत होती. मटण, चिकन दुकानावर फिजिकल डिस्टंसिग ठेवून ग्राहक खरेदी करत असले तरी भाजी बाजारात याचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांनी दुकानाच्या वेळ वाढविण्याची मागणी केली आहे.