रायगड - श्रीपाद हॉस्पिटलमध्येमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हा कर्मचारी झोपेतून अचानक उठल्याने चक्कर येऊन काचेच्या दरवाजावर कोसळल्याने डोक्याला जबर मार लागून काचाही अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाला. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारासाठी घेऊन जात असताना या कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील इसांबा फाटा इथे ही घटना घडली.
नेमके काय घडले-
सावरोली इसांबफाटा येथे मागील अनेक वर्षांपासून डॉ. मनोजकुमार मिश्रा यांचे श्रीपाद क्लिनिक आहे. या ठिकाणी रुग्णांना 24 तास सेवा देण्याची सुविधा आहे. मृत विनोद वर्मा हा कर्मचारी या ठिकाणी काम करीत होता. विनोद हा सोमवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान रात्री कोणी रुग्ण नसल्याने केबिनमध्ये झोपला होता. असताना अचानक जाग आल्याने तो दरवाज्यापर्यंत चालत आला आणि परत झोपण्यासाठी जात असताना अचानक चक्कर आल्याने काचेच्या दरवाजावर कोसळला. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागल्याने आणि खालीच पडून राहिल्याने दरवाज्याच्या काचा अंगावर पडून गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध झाला. हा प्रकार काही वेळानंतर सहकारी वर्गाच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
चौकशीअंती अपघात जाहीर -
या घटनेनंतर खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करीत असताना परिस्थितीनुसार रक्ताचा सडा पाहून हा घात की अपघात अशीच शंका प्रत्येकाच्या मनात येऊ लागली. मात्र, या क्लिनिकमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत असताना त्यातील चित्रफितीनुसार तिथे कोणीच आले नसून विनोद स्वतःच चक्कर येऊन पडल्याचे दिसून आले. त्यानंतर हा घात नसून अपघात असल्याचे पोलिसांनी जाहीर केले. यानंतर पहाटे विनोदचा मृत्यदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला व उत्तर प्रदेशात असणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.
हेही वाचा - 13 वर्षाच्या मुलीला गर्भपातासाठी परवानगी नाही - मुंबई उच्च न्यायालय