रायगड - जिल्हा बदली झाल्यानंतर शिक्षकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश काढून देण्याकरीता एका शिक्षकाला 1 लाख 20 हजारांची लाच मागितली. लाचेप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अशोक कुकलारे याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. शिवाय संजय विठ्ठल ढमाले व निवृत्ती नींबा भूले या दोन प्राथमिक शिक्षक दलालांनाही अटक करण्यात आले आहे.
हेही वाचा - पर्यावरणपूरक बाप्पा.! ३३०० पेन्सिलची आरास, विसर्जनानंतर विद्यार्थ्यांना देणार भेट
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी व प्राथमिक शिक्षक यांना शिक्षक दिनाच्या दिवशी पकडले गेल्याने शिक्षण विभागातील भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे. अशोक कुकलारे यांच्या टेबलाची तपासणी केली असता पुन्हा 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड सापडली असून ती जप्त केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही दिवसांपूर्वी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया झाली होती. यात तक्रारदार व इतर दोन शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कार्यमुक्त आदेश पाहिजे होते. तो आदेश देण्यासाठी आरोपी अशोक कुकलारेने तक्रारदार व इतर दोन शिक्षकांकडे प्रत्येकी 40 हजारांच्या लाचेची मागणी केली आणि सदर रक्कम संजय ढमाले व निवृत्ती भुले यांच्याकडे देण्यास सांगितले.