रायगड - कोरोनाबाधीत रुग्णांवर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही. प्लाझ्मा थेरपी ही कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास उपयुक्त ठरत आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यत ११ हजारहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना मुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा थेरिपीच्या अनुषंगाने आपल्या रक्ताचे दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले आहे. त्याच्या या रक्तदानाने दगावणारे कोरोनाबाधीत रुग्ण हे बरे होऊ शकतात असा विश्वास डॉ. माने यांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बरे होण्याचे प्रमाणही चागले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी रक्तदान करणे महत्वाचे आहे. कोरोनावर अद्याप कोणतीच लस अजून निघाली नसल्याने प्लाझ्मा थेरपी ही सध्या कोरोनावर रामबाण उपाय आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनी पुढे येऊन रक्तदान करा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माने यांनी केले आहे.
प्लाझ्मा थेरपी मध्ये एका कोरोनाबाधीत रुग्णाला चार जणांनी रक्तदान करणे महत्वाचे आहे. ही थेरपी ज्या कोरोनाबाधित रुग्णाची तब्येत नाजूक असून दगावण्याची शक्यता असते त्यांना उपयुक्त आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्याची यादी तयार केली असून त्यांना आपण रक्तदान करा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातही प्लाझ्मा थेरपीसाठी नागरिक रक्तदान करण्यास पुढे येतील, असा विश्वासही डॉ. माने यांनी व्यक्त केला आहे.