रायगड - रायगड जिल्ह्याला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे या समुद्राच्या पाण्यात स्नानाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. पर्यटकांना यानिमित्ताने मुरुड आणि आगरदांडा समुद्रामध्ये डॉल्फिनचे दर्शन बऱ्याच वेळेला होत आहे.
गोवा येथे पर्यटनास येणारे पर्यटक डॉल्फिन पाहण्यासाठी बोटीने समुद्रात आवर्जून जात असतात. त्यामुळे, येथील नागरिकांनाही रोजगार मिळत असतो. जिल्ह्यातील मुरुड समुद्रात आगरदांडा दिघी जलमार्ग, तसेच पद्मदुर्ग किल्ला पाहायला जातानाही डॉल्फिनचे दर्शन होत असते. या ठिकाणी स्थानिक बोट मालकांनी डॉल्फिन दर्शन सुरू केले तर, येणारे पर्यटकही डॉल्फिन पाहण्यासाठी आवर्जून भेट देवू शकतील. त्यामुळे रोजगाराची संधी स्थानिकांना प्राप्त होऊ शकते.
मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्ल्याजवळ तसेच आगरदांडा येथून दिघीला जलवाहतुकीने जाताना डॉल्फिनचे दर्शन पर्यटकांना होत आहे. समूहाने हे डॉल्फिन समुद्रात क्रीडा करताना दिसत आहेत. साधारण ७ ते ८ डॉल्फिन समुद्रात विहार करतात. खाडीचे पाणी शांत असताना मोठ्या प्रमाणात डॉल्फिन दिसत आहेत.
पूर्वी रेवदंडा, मुरुड, आगरदांडा आणि दिघी या खाडी भागात डॉल्फिन मोठ्या प्रमाणात होत्या. कालांतराने समुद्रात वाढलेल्या रेतीच्या बोटी, कंपनीच्या मालवाहतूक बोटी यामुळे डॉल्फिनची संख्या कमी होत गेली. पूर्वी रेवदंडा खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचे वास्तव्य होते. मात्र, आता ते नगण्य झाले आहे.