रायगड - इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबागच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागात कपडे, औषधे, खाण्याच्या वस्तू, भांडी ही वस्तूरूपी मदत पाठविण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतही एक लाख एक हजार रुपयांची मदत चेकद्वारे देण्यात आली आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील लाखो नागरिक पुरात अडकले. या नागरिकांना सुस्थळी हलविण्यात आले असून आता पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे विविध स्तरांतून सांगली, कोल्हापूरला मदतीचा हात दिला जात आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग शाखेतर्फे डॉक्टरांनी एकत्रित येऊन पूरग्रस्त भागाला सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पूरग्रस्त भागांत कपडे, खाण्याच्या वस्तू, भांडी आणि मेडिसिन्स पाठविले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक लाखाची मदतही चेकने बँकेत भरण्यात आली आहे. वस्तू रुपी गोळा केलेली मदत व्यवस्थित बॅगेत पॅक करून अलिबागमधील डॉ. अरविंद केळकर यांच्यामार्फत पूरग्रस्त भागात पोहोचविण्यात येणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष राजेंद्र चांदोरकर यांनी सांगितले.
अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, डॉ राजेंद्र चांदोरकर अध्यक्ष, संजीव शेटकार सचिव, डॉ. सतीश विश्वेकर खजिनदार, डॉ चंद्रकांत वाजे, डॉ. एस एन तिवारी, डॉ. किरण नाबर, डॉ. अतुल तांबोळी, डॉ. प्रशांत जन्नवार, डॉ विनायक पाटील, डॉ. समीर नाईक, डॉ ओजस्विनी कोतेकर, डॉ अनिता शेटकार, डॉ राजश्री चांदोरकर, डॉ प्रणाली पाटील, डॉ स्वाती विश्वेकर यावेळी उपस्थित होते.