रायगड - नवजात बालकाला रसायनी येथील कचऱ्याच्या मैदानात टाकून जन्मदात्री निघून गेली होती. हा प्रकार 1 सप्टेंबरला घडला होता. त्या बालकाला जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रसायनी पोलिसांच्या मदतीने नवे जीवन मिळाले आहे. या नवजात अभ्रकाला अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले आहे.
कचऱ्यात टाकलेल्या नवजात बालकाला डॉक्टर अन् पोलिसांनी दिले जीवदान 1 सप्टेंबरला रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा साठवणूक केलेल्या मैदानावर कोणीतरी अज्ञाताने फेकून दिले होते. हे अभ्रक पुरुष जातीचे असून याबाबत रसायनी पोलिसांना एका महिलेने माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अभ्रकाला ताब्यात घेऊन रात्री साडे बाराच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. हे नवजात बालक कमी वजनाचे व कमी दिवसाचे होते. रुग्णालयात आणले तेव्हा त्याला धाप लागली होती आणि पोटात रक्तस्राव झाला होता. त्याचे वजन 1 किलो 820 ग्रॅम होते. बालकाला रुग्णालयात आणल्यानंतर तातडीने त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. औषधोपचार करून बाळाला सुस्थितीत केले. आता त्या बाळाची प्रकृती उत्तम असून त्याचे वजन आता 1 किलो 920 ग्राम झाले आहे. डॉक्टर आणि परिचारिकांनी बाळाची उत्तम काळजी घेतल्याने आज हे बालक जग पाहतोय. त्यामुळे बाळाला आता अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार डी. जी. देडे, पी. आर. जंगम यांनी 22 दिवस या बालकाची रुग्णालयात राहून काळजी घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. बालरोग तज्ज्ञ डॉ. एम. एस. क्षीरसागर, डॉ. आशिष पाटील, डॉ. मंजुश्री शिंदे, डॉ. सागर खेदु, डॉ. प्रीतम वरसोलकर, डॉ. पोटे, परिचारिका यांनी मुलाची काळजी घेऊन नवीन जीवन दिले आहे.हेही वाचा - मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना अटक; विनापरवानगी केला होता रेल्वे प्रवास