रायगड - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्र खवळला असून मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्या आहेत. चक्रीवादळासह मुसळधार पाऊसही किनारपट्टीवर सुरू झाला आहे. त्यामुळे 14 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात उसळणाऱ्यावर लाटा पाहण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी चक्रीवादळ हे समुद्रात होणार आहे. मात्र, याचा फटका समुद्र किनाऱ्याला बसणार आहे. समुद्रात 30 ते 40 किमी तासाने वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्याने समुद्र खवळलेला आहे. समुद्र खवळलेला असल्याने लाटा समुद्र किनाऱ्यावर धडकत आहेत.
समुद्रात चक्रीवादळ सुरू झाले असल्याने मच्छीमारांनाही समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. उन्हाळी सुट्टी अजून संपली नसल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी आले आहेत. त्यामुळे उसळलेल्या समुद्रात पर्यटकांना जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.