रायगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण नगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांना रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. चिंचपाडा येथील प्रभागातून आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बुधवारपासून या गोळ्या वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे आमदार रविशेठ पाटील यावेळी म्हणाले.
आर्सेनिक अल्बम गोळ्या या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. शहरातील नागरिकांना या गोळ्यांचा नक्कीच फायदा होईल, असे पाटील म्हणाले. मुंबई, पुणे तसेच इतर मोठ्या शहरातून येणाऱ्या लोकांपासून हा रोग पसरण्याची जास्त शक्यता आहे, त्याबाबत नगरपालिकेने काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमास नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, राजा म्हात्रे, दीपक गुरव, मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या सह सर्व नगरसेवक, आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण हे उपस्थित होते. कोरोनाचे युद्ध जिंकून स्वतःला व आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी यावेळी केले. तसेच शहराबाहेरील व्यक्ती आल्यास त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. आर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक गोळ्यांचे पेण शहरातील सर्व दहा प्रभागात वाटप करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले.