रायगड - रायगड जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लसीकरणासाठी नोंदणी करताना अलिबागसह जिल्ह्यातील नागरिकांना वेळेमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेकजण लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे लसीकरण ऑनलाइन नोंदणीसाठी योग्य वेळेचे नियोजन करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
5 हजाराहून अधिक नागरिकांनी घेतली लस
रायगड जिल्ह्यात 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. जिल्ह्यात या वयोगटातील आणि 45 वर्षावरील नागरिकांसाठी 68 हजार डोस उपलब्ध झाले आहेत. तर आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील जवळपास 5 हजाराहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. यासाठी त्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती.
अनेकांना मिळत नाही लसीची वेळ
18 ते 44 वयोगटातील नागरिक लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करत आहेत. मात्र, त्यांना नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. लसीकरण कोठा पूर्ण झाला असल्याचे रजिस्टर करणाऱ्या लाभार्थ्यांना सांगितले जात आहे. तर जिल्ह्याबाहेरील नागरिक जिल्ह्यात येऊन लस घेऊन जात असल्याने अलिबागसह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
'ऑनलाइन नोंदणीची वेळ निश्चित करावी'
लसीकरणासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अनेकजण सकाळी सात वाजल्यापासून लसीकरणासाठी नोंदणी करत आहेत. तरीही नोंदणी होत नाही. अशा अडचणी अनेकांना येत आहेत. त्यामुळे नागरिक लसीपासून वंचित राहत आहेत. यामुळे नागरिक संतप्त होत आहेत. 'शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत नोंदणीची वेबसाइट सुरू करावी आणि नोंदणीसाठी निश्चित वेळ ठेवावी', अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा - आईच्या मदतीने दोन सख्ख्या भावांचा तरुणीवर बलात्कार; तब्बल पाच वर्षांपासून सुरू होता प्रकार
हेही वाचा - गुहागरमध्ये नवरदेवच निघाला पॉझिटिव्ह, संपूर्ण वऱ्हाडी मंडळी विलगिकरणात