रायगड - गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळ वेळी शासनाने दिलेली मदत ही कमी प्रमाणात दिली होती. अद्यापही काही जणांना ती मदत पोहोचलेली नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा चक्रीवादळ आले असून त्यात कोरोनामुळेही नागरिक अडचणीत आहेत. तौक्ते चक्रीवादळात यावेळी कमी जिल्ह्यांना फटका बसला असल्याने राज्य शासनाने या जिल्ह्यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तौक्ते चक्रीवादळात जिल्ह्यात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आज (बुधवारी) देवेंद्र फडणवीस हे रायगड दौऱ्यावर आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून वादळाच्या नुकसणीबाबत आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारवर त्यांनी नुकसान मदतीबाबत निशाणा साधला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते उपस्थित होते.
हेही वाचा - नौदलाचे आभार मानताना 'बार्ज'वरील कर्मचाऱ्याला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ..
आता तरी भरीव मदत द्या -
3 जून 2020मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला होता. यात हजारो कोटींचे नुकसान झाले होते. शासनाने नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली. मात्र, अद्यापही अनेकांना मदत पोहोचली नाही. मच्छीमारांनाही मदत पोहोचली नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. निसर्ग चक्रीवादळापेक्षा तौक्ते चक्रीवादळाचा फटका हा काही जिल्ह्यांनाच बसला आहे. राज्य सरकारला या जिल्ह्यांनाच मदत करायची आहे. त्यामुळे त्यांनी भरीव मदत करावी, अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाकडे केली.
जिल्हा प्रशासनाने वादळात केले योग्य नियोजन -
तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली. वादळात चार जणांचा जीव गेला. जिल्ह्यात पाच हजार हेक्टर बागायतीचे नुकसान झाले आहे. तर महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे माहिती देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिली.
हेही वाचा - समुद्रातील उंच उंच लाटात नौदलाच्या आयएनएस कोचीने सुखरूप वाचवले; जीवनराम यांची आपबीती