रायगड - जिल्ह्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिध्द असलेले महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गाव आजही अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. तेथील नागरिकांना सोयी सुविधांची वणवा भेडसावत आहे. खड्डेमय रस्ते, दुषित पाणी, उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांची कमतरता या मुलभूत सुविधांसह सैनिक स्मारकाची दुर्दशा तसेच गावाला अन्य सुविधा पुरविण्यात शासन अपयशी ठरले आहे. यामुळे फौजी आंबवडे येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले.
महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गाव परंपरेने सैनिक कुटूंबातील आहे. गेल्या २५० वर्षापासून म्हणजे ब्रिटीश काळापासून आजपर्यंत देशाची सेवा हे गाव करीत आहे. पहिल्या महायुध्दातून १९१४ ते १९९९ या कालावधीत १११ जवानांनी भाग घेतला होता. त्यातील ६ जवान शहीद झाले. त्याचे प्रतिक म्हणून ब्रिटीशकालीन स्मारक त्यांच्या स्मरणार्थ गावात उभारलेले आहे. १९६२ च्या भारत - चीन, १९६५ च्या भारत- पाकीस्तान युध्दामध्ये या गावातील २५० सैनिक सहभागी झाले होते. त्यामध्ये सुभेदार रघुनाथ कदम हुतात्मा झाले. १९७१ च्या युध्दामध्येही ४०० हून अधिक सैनिक सहभागी झाले होते.
त्यातील नायक मनोहर पवार यांना त्यांच्या पराक्रमासाठी सेनापदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबरच पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, गोवा पोर्तुगाल युद्ध, आयपीकेएफ श्रीलंका, १९६२ चीन युद्ध, १९६५ पाकिस्तान युद्ध, कारगिल युध्दात गावातील सैनिकांचा समावेश होता. या गावातील सैनिकांनी आजपर्यंत देशाच्या रक्षणासाठी सीमेवर राहून देशाचे रक्षण केले असून करीत आहेत. या गावातील १० माजी कप्तान, २० माजी सुभेदार, २५० माजी सैनिक असून सध्या २०० हून अधिक सैनिक देशसेवेसाठी काम करत आहेत.
मात्र फौजी आंबवडे गावाचा विकास करण्यास शासन अपयशी ठरला आहे. गावातील रस्ता, पाणी अशा अनेक सुविधांपासून सैनिकी गाव वंचित राहिला आहे. या गावाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आरोग्यसेवेचा देखील बोजवारा उडाला आहे. रस्ता खराब असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ या गावातील सैनिकांसह माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबियावर आली आहे. त्यामुळे माजी सैनिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे समस्यांचे गार्हाणे मांडले. यावेळी आजी - माजी सैनिक संघटनाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सुभेदार काशीनाथ पवार, माजी कप्तान विजय जाधव, हवालदार बाळाराम पवार, तुकाराम पवार आदी उपस्थित होते.