रायगड - रायगडमधील औषध विक्रेत्यांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट डिस्ट्रीब्युटर संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष लिलाधर पाटील, जिल्हा सचिव प्रविण वावंधर, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष मितेश शहा यांनी राज्य शासनाकडे लेखी निवेदनातून केली आहे.
औषध विक्रेत्यांकडून 24 तास सेवा
देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. परंतु सुरुवातीपासून औषध विक्रेता व तेथील कर्मचारी हे आपल्या जीवावर उदार होऊन 24 तास सेवा देत आहेत. त्यामुळेच संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत झालेली आहे. औषधी विक्रेत्यांचा प्रत्यक्ष संबंध हा कोविड पेशंट अथवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांशी जवळून येतो व त्यात त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
200 हून अधिक औषध विक्रेत्यांचा कोरोनामुळे मृत्यू
राज्यासह देशात 200 पेक्षा अधिक औषध विक्रेते हे कोविड-19 चे बळी पडले असून 1 हजारांच्या आसपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झाले आहेत. असे असूनही केंद्र किंवा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु साधे लसीकरणात प्राधान्यही दिले नाही. याची खंत सर्व विक्रेत्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मनात असून ते राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. यासंदर्भात संघटनेचे अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी वेळोवेळी केलेल्या पत्र व्यवहाराचीही दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे सरकारची भूमिका अशीच राहिली तर सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेता संघटनाला संपूर्ण लाॅकडाऊनमध्ये सहभागी होऊन हा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा जिल्हा अध्यक्ष लिलाधर पाटील, सचिव प्रविण वावंधर, पेण तालुका अध्यक्ष मितेश शहा यांनी निवेदनातून दिला आहे.
हेही वाचा - ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला पंजाब पोलिसांनी केली अटक; हत्येचा आहे आरोप