रायगड - महिला बचतगटांच्या कर्जमाफीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. कोरोनाच्या या महामारीत महिला बचतगटांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाले आहे. दुसरीकडे विमा काढूनही त्याचा लाभ मिळत नाही, त्यामुळे हे कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी मनसेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज महिलांचा मोर्चा काढण्यात आला. रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
एकीकडे कोरोनामुळे व्यवसायातून येणारे उत्पन्न ठप्प आहे. तर दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. विम्याचा हप्ता वेळेच्यावेळी भरून देखील लाभ मिळत नाही. अशा तिहेरी संकटात या महिला सापडल्या आहेत. त्यामुळे सरकारने हे कर्जमाफ करावे अशी मागणी या महिलांनी केली आहे.
कोरोनाचा फटका बसल्याने कर्ज फेडायला अडचण
देशासह राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्याचा फटका सर्वच व्यावसायिकांना बसला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बचत गट देखील आडचणीत आलेत. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते कसे फेडणार असा सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सरकारने या मायक्रो फायनान्स कंपन्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी महिला बचत गटांकडून करण्यात येत आहे.