रायगड - कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने, अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी महड येथील श्री वरद विनायकाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतल्याची माहिती संस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती महडच्या श्री वरद विनायकाची आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या वरद विनायकाचे मंदिर खोपोली रेल्वेस्थानकापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात कायमच भाविकांची गर्दी असते.
मंदिर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
मंगळवारी अंगारकी चतुर्थीचा योग असून, भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी अंगारकी चतुर्थीला सोमवार दि. १ मार्च रोजी रात्री ११ ते मंगळवार दि. २ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संस्थानने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संस्थानच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य यांनी दिली आहे. कोरोनाचे संकट पुन्हा डोकं वर काढत आहे. सरकारने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. वरद विनायकावर भाविकांची श्रद्धा असून, अंगारकी चतुर्थीला गर्दी होण्याची शक्यता असल्याने, गर्दी टाळण्यासाठी मंदिर एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.