रायगड - नारळी पौर्णिमेचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, "नारळ फोडी" हा पारंपरिक खेळ येथे खेळला जातो. अलिबाग तालुक्यात गावोगावी नारळ फोडण्याच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात लहान मुले, तरुण मंडळी एकत्र जमून आपल्याकडील नारळ दुसऱ्याच्या नारळावर आपटून फोडताना दिसत होते. यानिमित्ताने नारळांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे पाहायला मिळाली.
रायगड जिल्ह्यासह कोकणात नारळ पौर्णिमा या सणाच्या निमित्ताने नारळ फोडी हा पारंपारिक खेळ खेळला जातो. यासाठी नारळ हा महत्वाचा असून तो जेवढा टणक तेवढे जिंकण्याची संधी जास्त असते. नारळ फोडीच्या खेळासाठी लागणारे नारळाचे झाड हे वेगळे असून त्या नारळाचा भावही जास्त असतो. मात्र, काळानुरूप ही नारळाची झाडे कमी होत चालली आहेत. त्यामुळे रोजच्या वापरातील नारळे खेळण्यासाठी वापरली जात असल्याचे पाहण्यात आले.
नारळ फोडी या खेळात कितीही खेळाडू एकावेळी खेळू शकतात. एकाने तळहातावर नारळ पकडायचे आणि इतरांनी त्यावर आपल्या हातातील नारळ आपटायचे. यावेळी समोरच्याचा नारळ फुटल्यास नारळ फोडणारा विजयी ठरतो. तसेच फुटलेले नारळ देखील त्याला मिळते. यामुळे या खेळाला अधीक रंगत येत.
नारळी पौर्णिमेच्या निमीत्याने हा खेळ सर्वत्र खेळला जातो. या खेळात लहानापासून मोठे सहभागी झाले होते. पूर्वीच्या तुलनेत या खेळाचे महत्व कमी झाले असले, तरी अजूनही जिल्ह्यातील काही भागातील लोकांनी पूर्वापार चालत आलेला नारळ फोडीचा खेळ जतन करून ठेवला आहे.