खालापूर (रायगड) - खालापूर तालुक्यातील महड अष्टविनायक क्षेत्र येथे रविवारी (ता. 31) संकष्टी चतुर्थीनिमित्त वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच लागलेल्या भाविकांच्या रांगा संध्याकाळी उशिरापर्यंत रांगाच रांगा होत्या. मंदिर व्यवस्थापन कमिटी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास पन्नास हजारहून अधिक भाविक-भक्तांनी दर्शन घेतले.
हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराज की जय! गंगापूरमध्ये भव्य मिरवणूक काढत अश्वारूढ पुतळ्याची स्थापना
संकष्टी चतुर्थी आणि त्यात सुट्टीचा रविवार आल्याने महड येथील अष्टविनायक क्षेत्र येथे वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. सकाळपासूनच गणपती संस्थान स्वागत कमानीबाहेर भक्तांची रांग लागली होती. दुपारनंतर ही रांग वाढून वळण रस्त्यापर्यंत पोहोचली होती. या गर्दीमुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. संकष्टी चतुर्थी निमित्ताने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून श्रीक्षेत्र महड देवस्थान व्यवस्थापन कमिटी कार्यवाह मोहिनी वैद्य व केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान व्यवस्थापन कमिटी, स्थानिक नागरिकांनी आपआपल्या स्तरावर सोयी सुविधा उपलब्ध केल्याचे दिसले.
मंदिर व्यवस्थापक राजेंद्र बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंतच पन्नास हजाराच्यावर भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले असून संध्याकाळी मोठी गर्दी होऊन ही लाखाच्या वर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दी बघता मंदिर परिसर व महड फाटा येथे पोलीसांनी चोख व्यवस्था ठेवली होती.
हेही वाचा - विशेष बातमी; पिंपरीत गुलाबी थंडीची चाहूल; पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी