रायगड - मोहोप्रे गावचे हद्दीत गांधारी पुलाजवळ खड्ड्यामध्ये अडकलेल्या मगरीला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा अंतर्गत सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामातील खड्ड्यांमध्ये ही मगर अडकली होती. वन खात्याचे अधिकारी आणि महाड येथील सिस्केप संस्थेच्या सदस्यांनी बाहेर काढून तिला हिंदू स्मशानभूमीनजिक घाटावरून सावित्री नदीत सोडून जीवदान दिले आहे.
महाडच्या बाजुने वाहणाऱ्या सावित्री आणि गांधारी नदीमध्ये मोठ्या संख्येने मगरींचे वास्तव्य आहे. गांधारी नदीतील एक साडेसात फुटी मगर मोहोप्रे गावचे हदीत नवीन पुलाच्या बांधकामातील खड्ड्यात जाऊन अडकली होती. एल अॅन्ड टीच्या इंजिनिअरने ही अडकलेली मगर आज पाहताच वन खात्याचे अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. वनक्षेत्रपाल शिंदे यांनी महाडमधील सिस्केप संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधून आज दुपारी एकत्रितरित्या खड्यात अडकलेल्या मगरीला सुरक्षितरित्या बाहेर काढले.
याकामी सिस्केपचे योगेश गुरव, प्रणव कुलकर्णी, अक्षय भाटे, ओम शिंदे, नितीन कदम, वनरक्षक पि. डी. जाधव, प्रकाश पवार यांनी मोलाची कामगिरी बजावली.