रायगड - जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाई समस्या असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. मात्र, या पाणी टंचाईचा सामना चक्क मगरीला सहन करावा लागला असल्याची घटना श्रीवर्धन तालुक्यातील जसवली येथे घडली. उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे, तसा तो प्राण्यांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे पाण्याच्या आणि खाण्याच्या शोधात निघालेली मगर ही लोकवस्तीत चक्क रूग्णालयाजवळ पोहोचली.
श्रीवर्धन तालुक्यात बुधवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास जसवली गावात शासकीय रुग्णालयाजवळ मगर आल्याने एकच खळबळ उडाली होती. कारण ही मगर सुमारे ९० ते १०० किलो वजनाची आणि साधारण सात फुट लांबीची होती. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती वन विभगाला दिली. माहिती मिळताच श्रीवर्धनचे वन अधिकारी नरेंद्र पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने ती मगर शिताफीने पकडली. वन विभागाने या मगरीला मगरीचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी सोडून दिल्याचे वन अधिकारी नरेंद्र पाटील सांगितले. मगरीला पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.