रायगड - जिल्ह्यासाठी आणखी ११ हजार कोव्हीशिल्ड लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असली तरी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरणाला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. जिल्ह्यातील 36 टक्के आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून दूर आहेत. सोमवारपासून पोलीस, महसूल आणि स्वछता कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. गजानन गुंजकर यांनी दिली आहे.
३ हजार १०८ जणांनी घेतली आतापर्यंत लस-
आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. ३० जानेवारी अखेर जिल्ह्यातील ४ हजार ९०८ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित होते. यापैकी ३ हजार १०८ जणांनी प्रत्यक्ष लस घेतली आहे, हे प्रमाण अपेक्षित लसीकरणाच्या ६४ टक्के येवढेच आहे. खासगी डॉक्टरही लसीकरणापासून दूर असले तरी त्यांनीही आता लस घेण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात आठ केंद्रावर लसीकरण सुरू
रायगड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी ९ हजार ७०० कोव्हीशिल्ड उपलब्ध झाल्या आहेत. १६ जानेवारी पासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. जिल्ह्यात सध्या अलिबाग, पेण, पनवेल, माणगाव आणि कर्जत येथील सात केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. पेण येथील लसीकरण पुर्ण झाले आहे. उरण येथे आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महाड आणि श्रीवर्धन येथेही लसीकरण सुरू करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खासगी डॉक्टरांनीही लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन-
जिल्ह्यात ज्या ३ हजार १०८ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यांना आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा तीव्र त्रास जाणवलेला नाही. अंगदुखी आणि सौम्य ताप सर्वसाधारण लक्षणे काही जणांमध्ये दिसून आली आहेत, त्यामुळे लसीला घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. गजानन गुंजकर यांनी स्पष्ट केले आहे. खासगी डॉक्टरांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलीस, महसूल, स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोमवारपासून लसीकरण
आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांना पहिल्या टप्यात लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात २० हजार कोव्हीशिल्ड साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सोमवारपासून दुसऱ्या टप्यातील लसीकरण सुरू केले जाणार आहे. यामध्ये कोविड केअर सेंटरवर आरोग्य यंत्रणे सोबत काम केलेल्या पोलीस, महसूल कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांनादेखील सोमवारपासून लसीकरण दिले जाणार असल्याची माहिती डॉ. गजानन गुंजकर यांनी दिली आहे.