रायगड - कोरोनामुळे छोट्या मोठ्या उद्योजक आणि व्यवसायिकांना आर्थिक फटका बसला असून समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या हातगाडी व्यवसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू असल्याने समुद्रकिनारेही बंद आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिक यांनाही बाहेर फिरण्यास बंदी असल्याने समुद्रकिनारी असलेले व्यवसायही ठप्प झाले आहेत. समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्या या व्यवसायिकांना आता पुढील सहा-सात महिने कसे काढायचे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. आमच्या सारख्या छोट्या व्यवसायिकांनाही शासनाने मदत घ्यावी अशी मागणी हातगाडी संघटनेकडून केली जात आहे.
रायगड हा पर्यटन जिल्हा आहे. समुद्रकिनारे, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे असल्याने लाखो पर्यटक जिल्ह्यात पर्यटनास येत असतात. अनेक पर्यटकांना रायगडचे निसर्गरम्य समुद्र किनारे हे खुणावत असतात. जिल्ह्यात अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, किहीम, मांडवा, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर याठिकाणी विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी बहरलेली असतात. मात्र कोरोनच्या संकटामुळे आज समुद्र किनारे ओस पडले आहेत.
समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने याठिकाणी भेळपुरी, बर्फगोळे, सरबत, नारळ पाणी, खेळणी, खाण्याच्या गाड्या, जेस्की, बोटिंग असे छोटे व्यवसाय करणारे व्यवसायिक आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र सध्या कोरोनाचे संकट आल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटकांना आणि नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी केलेली आहे. सर्व व्यवहार बंद पडले आहेत. याचा परिणाम हा समुद्र किनारी व्यवसाय करणाऱ्यांवर पडला आहे.
एप्रिल, मे महिन्यात शाळा कॉलेजना सुट्टी पडल्यानंतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास येत असतात. त्यामुळे समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. मात्र, यावेळी कोरोनामुळे एप्रिल, मे महिना हा संचारबंदीत जाणार असल्याने आणि पुढे चार महिने पावसाळा असल्याने समुद्रकिनारी व्यवसाय करणाऱ्यांना हे महिने कसे ढकलायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे प्रशासन परराज्यातील मजूर, कामगार यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत असताना आमच्यासारख्या रोज कमवणाऱ्या छोट्या व्यवसायिकाकडेही प्रशासनाने लक्ष देऊन मदत करावी, अशी आर्त मागणी अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या एकता हातगाडी संघटनेचे उपाध्यक्ष प्रसाद कोरडे यांनी संघटनेमार्फत केली आहे.