रायगड - तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील लघुपाटबंधारे, मातीचे धरण, जिल्हा परिषद अखत्यारित असलेल्या धरणांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच त्यासंबधी येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून ढबेवाडीतील २३ जणांना जलसमाधी मिळाली. त्यापैकी १४ जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. याच घटनेच्या धर्तीवर जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात लघुपाटबंधारे आणि जिल्हा परिषद अंतर्गत अनेक धरणे आहेत. यापैकी काही धरणे जुनी असून त्याची डागडूजी करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धरणांची पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेशही दिले आहेत.
काय आहे तिवरे धरण दुर्घटना -
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणे मंगळवारी रात्रीच्या सुमारास फुटले. त्यामध्ये २३ जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर बचाव पथकाने बुधवारी सकाळपासून शोधमोहीम राबवली. त्याद्वारे आतापर्यंत जवळपास १४ जणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.
गेल्या २ वर्षांपासून या धरणातून गळती सुरू होती. ग्रामस्थांनी वारंवार तक्राही केली. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे शेवटी मंगळवारच्या काळरात्री हे धरण फुटले. त्यामुळे तिवरे, भेंदवाडीतील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. गुरे-ढोरे पाण्यात वाहून गेली आहेत. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला.