रायगड- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि वाहन चालकांना कार्यालयात असताना गणवेश परिधान करून येण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात परिपत्रक काढून हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या निर्देशांकडे कर्मचाऱ्याने दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच मुख्य विभागातील अधिकारी यांच्या वाहनांवरील वाहन चालक यांना शासन निर्णयानुसार विहित करून दिलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक आहेत. मात्र, याकडे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक कानाडोळा करित असल्याचे निर्दशनास आले. कार्यलयीन वेळेत गणवेश परिधान न करता कर्मचारी अन्य गणवेशात काम करीत होते. त्यामुळे कामकाजादरम्यान वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना ओळखणे कठीण जात होते. ही समस्या लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी परिपत्रक काढून वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी दिलेला गणवेश परिधान करणे बंधनकारक असल्याचे म्हटले व त्यासंबंधी परिपत्रक काढले. तसेच या सूचनांचे पालन न करणाऱ्या कर्मचारी व वाहन चालकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या या परिपत्रकानंतर चतुर्थ कर्मचारी व वाहन चालक या आदेशाचे पालन करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.