रायगड - लॉकडाऊनमध्ये टपऱ्या तसेच दारूच्या दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये दारू घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, चोरीच्या मार्गाने दारू विक्री करणारे आणि तंबाखू सिगारेट विकणारे आता ग्राहकांची चांगलीच लूट करत आहेत. मिळालेल्या संधीचा फायदा घेत सिगारेट, तंबाखू, दारू चढ्या भावाने विकत असल्याचे चित्र जिल्ह्यातील उरण भागात दिसत आहे.
चक्क दहापट जास्त पैसे आकारले जातात
राज्यात सर्वत्र लॉकडाऊनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यावेळी सकाळी 7 ते 11 या कालावधीमध्ये अत्यावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये पानटपऱ्या आणि दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तर दारू विक्रीसाठी घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागामध्ये चोरीच्या मार्गाने दारू विक्री करणारे आणि पान टपरीवाले सध्या मिळालेल्या संधीचा फायदा घेत ग्राहकांची चांगलीच लूट करत असल्याचे समोर येत आहे.
तंबाखू आणि सिगारेटसाठी ग्राहकांना तिप्पट पैसे मोजावे लागतात असून, टपरी चालक आपल्या बंद टपरीजवळ उभे राहून ग्राहकाच्या मागणीनुसार आजूबाजूच्या परिसरात लपवून ठेवलेल्या मालमधून ही विक्री करत आहेत. तर ग्रामीण भागामध्ये चोरीच्या मार्गाने होणाऱ्या दारू विक्रेत्यांकडून चक्क दहापट जास्त पैसे आकारण्यात येत असल्याची कुजबुज तळीरामांमध्ये सुरू आहे.
टपरी मालकांवर कारवाई व्हावी -
चोरीच्या मार्गाने विक्री होणारी दारू, तंबाखू आणि सिगारेट विक्री करणारे ग्राहकांची प्रचंड लूट करत आहे. ही लूट थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष द्यावे, तसेच चोरीच्या मार्गाने विक्री करणाऱ्या टपरी मालकांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.