रायगड - राज्यात महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणखी एक दणका दिला आहे. ठाकरे यांनी पनवलेचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सिडको अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतली आहे. त्यामुळे लवकरच सिडकोच्या अध्यक्षपदावर आता नवीन चेहरा पाहायला मिळणार असून, याबाबत निर्णय देखील झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा - महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दिपकसिंह रावत यांची नियुक्ती
महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा ठाकरे सरकारने लावला आहे. फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात येत आहेत. सर्व महत्त्वाच्या पदांवरून भाजपच्या नेत्यांना हटवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर 2018 मध्ये प्रशांत ठाकूर यांची ‘सिडको’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारने ही नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशांत ठाकूर हे देवेंद्र फडणवीसांचे समर्थक मानले जातात. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांचा सिडकोमध्ये ९०० कोटींचा ठेका असल्याचा आरोप करत काँग्रेसने आक्षेप घेण्यात आला होता.
कोकणच्या प्रवेशद्वारावर असलेले पनवेल हे भविष्यातील आर्थिक क्षेत्र असून रायगडमध्ये भाजप वाढीसाठी सिडको अध्यक्षपद महत्वाचे असल्याने भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी थेट दिल्लीपर्यंत बोळवण करण्यात आली होती. परंतु, आता ठाकरे सरकारने भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सिडको अध्यक्षपद काढून घेतल्याने भाजपला धक्का बसला आहे.
'सिडको’च्या अध्यक्षपदी आता नवीन चेहरा दिसणार आहे. मंत्रिमंडळात वर्णी न लागलेल्या आमदाराला सिडकोच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - बोगस पदवी प्रकरण : मंत्री उदय सामंत यांची विनोद तावडेंकडून पाठराखण