रायगड - अलिबाग तालुक्यातील चौल आग्राव रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आज ग्रामस्थांनी आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत डिसेंबरपर्यत रस्त्याचे काम पूर्ण करून देतो असे लेखी आश्वासन अधिकारी यांनी दिले, त्यानंतर चौलकरांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र डिसेंबरपर्यंत रस्त्याचे काम न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा रायगड जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चौल आग्राव या तीन किलोमीटर रस्त्याचे काम 2019 साली मंजूर होऊन सुप्रभात इन्फ्राझोन कंपनीला हे काम देण्यात आले होते. मात्र कंपनीने रस्त्याचे कामच सुरू न केल्याने हा रस्ता खड्डेमयच राहिला होता. खड्डेमय रस्त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर 14 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानुसार आज चौल नाका याठिकाणी राजीपचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थानी आंदोलन केले.
मुख्यमंत्री ग्राम सडक कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यानी आंदोलन मागे घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबसर तैनात करण्यात आला होता. चौल नाका येथे आंदोलन केल्याने दोन्हीकडची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
चौल आग्राव रस्ता हा अनेक वर्षे खड्डेमय असून ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. यासाठी हे आंदोलन केले असून डिसेंबर पर्यत हा रस्ता पूर्ण करतो असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले आहे. मात्र डिसेंबर पर्यत रस्ता न झाल्यास उग्र आंदोलन करू असा इशारा रायगड जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला आहे.