रायगड - भाजपा आमदार रवी पाटील यांचे पुत्र व पेण नगरपालिकेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी भर सभेत दादागिरी करून धमकाविले तसेच मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना मारण्यासाठी खुर्ची उचलली. अशा प्रकारे त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. भाजप आमदाराच्या पुत्राच्या दादागिरीला व दडपशाहीला कंटाळलेल्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी अखेर पोलीस ठाण्यात जात अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, पेण नगरिषदेमध्ये शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता पेण नगरपालिकेच्या स्थायी समितीचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू असताना अनधिकृत बांधकामधारक रंजना बांदिवडेकर यांना पेण पालिकेने नोटीस काढली नाही. याचा राग मनात धरून पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी आरडाओरड करून रागाच्या भरात दोन वेळा खुर्ची उचलून मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना मारण्यासाठी धावत जात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.
यासंदर्भात पेण पोलीस ठाण्यात कलम 353, 352, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही भाजपा आमदार रवी पाटील यांच्या दुसऱ्या पुत्राने देखील तत्कालीन मुख्याधिकारी यांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता.
हेही वाचा - मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपाचे राजकारण, खासदार सुनील तटकरे यांची टीका