रायगड - रसायनी पाताळगंगा एमआयडीसीतील कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकाऱ्याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने अधिकाऱ्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप तायडे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमलिन कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेशी कंपनीमधील अधिकारी दिलीप तायडे हा गेल्या काही महिन्यांपासून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता. पीडित महिला ज्या-ज्या ठिकाणी जायची त्याठिकाणी तायडे तिच्या पाठीमागे जात असे व तेथे जाऊन मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत असे. या प्रकरणी पीडितेने व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता, व्यवस्थापनानेही 'तू तुझे आठ तास काम कर, कामाच्या ठिकाणी हे चालतच राहणार, तुझ्यामुळे तायडे साहेब कंपनी तळोजा येथे घेवून जाणार आहेत' असे बेजबाबदारपणाचे उत्तर देऊन महिलेला गप्प बसवले.
अखेर कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याकडून होणाऱ्या या जाचाला कंटाळून पीडित महिलेने या बाबतची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर वारंवार कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करुनही तायडेच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर पीडित महिलेने रसायनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. या प्राप्त तक्रारीनुसार रसायनी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीने यापूर्वीही काही महिलांना मानसिक त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे.