रायगड - पावसामुळे रस्त्याचे काम सुरू होण्यास उशीर झाला असला तरी अलिबागचा आमदार हा शब्द पाळणारा आमदार आहे. माजी आमदार पंडित पाटील यांच्या मुलाच्या कंपनीला रस्त्याची साडे दहा कोटीचे काम मिळाले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अजून काम सुरू केलेले नाही. त्यामुळे माजी आमदारांनी रस्त्याबाबत केलेले आरोप अशोभनीय असून त्यांच्या कंपनीला आता काळ्या यादीत टाकण्याची वेळ आलेली आहे. जनतेने त्यांना घरी बसवले आहे. त्यामुळे त्यांनी घरीच बसावे, असा उपरोधिक टोला आमदार महेंद्र दळवी यांनी लगावला आहे.
बेलकडे-रोहा रस्त्याच्या खड्डे भरण्याच्या कामाचे उद्घाटन सोमवारी आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माजी आमदार पंडित पाटील यांनी केलेल्या आरोपाला दळवी यांनी उत्तर दिले आहे.
मला जनतेने निवडून दिले-
मी दिलेला शब्द पाळणारा आमदार आहे. माजी आमदार पंडित पाटील यांनी केलेले आरोप हे अशोभनीय आहेत. जनतेने त्यांना घरी बसवले आहे. आपल्या कंपनीला रस्त्याची करोडोची कामे मिळूनही दोन वर्षांपासून कामे सुरूच केलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. मला जनतेने निवडून दिले असून जनतेच्या समस्या सोडविणे माझे काम आहे. कोरोना काळात महाविकास आघाडी जनतेची कामे करीत आहेत. संकटकाळ असूनही जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे रस्त्याची कामे ही दिवाळीपूर्वी पूर्ण होतील असे आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी सांगितले.
खड्डेमय रस्त्यावरून आजी माजी आमदारांत शाब्दिक चकमक-
अलिबाग, रोहा, मुरुड या तालुक्यातील खड्डेमय रस्त्यावरून आजी माजी आमदारांमध्ये सध्या शाब्दिक चकमक उडाली आहे. माजी आमदार पंडित पाटील यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप चार दिवसांपूर्वी केला होता. त्या आरोपाला आमदार महेंद्र दळवी यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे सध्या आजी माजी आमदारांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीची चर्चा रंगली आहे.
अलिबाग, मुरुड रोहा रस्त्याची झाली खड्डेमय अवस्था-
अलिबाग रोहा, साळाव रोहा, साळाव मुरुड या रस्त्याची अवस्था ही खड्डेमय झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अलिबाग, रोहा, मुरुड या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी वारंवार रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर आंदोलन, मोर्चे काढले आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे अनेकांना पाठदुखी, मानदुखी सारखे आजार जडले आहेत.
खड्डे भरण्याच्या कामामुळे प्रवाशांचा प्रवास होणार खड्डेमुक्त-
अलिबाग रोहा, साळाव रोहा, साळाव मुरुड या रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खड्डेमुक्त रस्त्याने प्रवास करण्यास मिळणार आहे. मात्र असे असले तरी हे तिन्ही रस्ते कायमस्वरूपी सुस्थितीत, आरामदायी बनवावे अशी मागणीही यानिमित्ताने नागरिकांकडून केली जात आहे.
रस्ते चांगले तर पर्यटन मस्त-
अलिबाग मुरुड हे पर्यटन तालुके आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे पर्यटनास अलिबाग, मुरुडमध्ये येत असतात. मात्र सध्या खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे पर्यटकही नाराज आहेत. खड्डेमुक्त रस्ते झाल्यास पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे रस्ते चांगले तर पर्यटन मस्त अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.