रायगड - पनवेल तालुक्यातील आपटामध्ये रात्री मुक्कामी आलेल्या एसटी बसमध्ये बॉम्ब सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असताना चालक गजानन जारंडे (वय 31) याने एसटी महामंडळाची फसवणूक करून अनधिकृत सामानाची वाहतूक बसमध्ये करत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे त्याला एसटी प्रशासनाकडून निलंबित करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये अनधिकृतपणे सामान घेतल्याबद्दल एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे बॉम्बच्या घटनेने या चालकाचे अवैधपणे चाललेले धंदे समोर आल्याने त्याला निलंबित केले असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. गजानन जारंडे हे कर्जत डेपोचे कर्मचारी असून २१ फेब्रुवारी रोजी अलिबाग- कर्जत ही बस घेऊन ते निघाले होते. त्यावेळी अलिबागमधून एका इसमाने त्यांच्याकडे एक बॉक्स पेणमध्ये नेण्यासाठी दिला होता. याबाबत त्या व्यक्तीने जारंडे यांना काही रक्कम दिली होती. जारंडे यांनी तो बॉक्स आपल्या सीटच्या मागे ठेवला आणि पेण आल्यावर तो बॉक्स दुसऱ्या व्यक्तीला दिला.
कर्जतमध्ये बस पोहोचल्यानंतर दुसरी बस घेऊन चालक जारंडे कर्जतवरून आपटामध्ये वस्तीसाठी आले. त्यानंतर बॉम्ब एसटी बसमध्ये भेटल्याची घटना घडली. या घटनेचा तपास करत असता, पोलिसांना पेण आगारातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जारंडे हे अलिबागमधून घेतलेला बॉक्स दुसऱ्या व्यक्तीला देताना दिसले. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता, एसटी महामंडळाची फसवणूक करून अनधिकृतपणे सामानाची ने-आण करण्याचे त्यांचे प्रकरण समोर आले.
या फसवणुकीबाबत पोलिसांनी एसटी प्रशासनाला माहिती दिली असून त्याच्या आधारे गजानन जारंडे यांना निलंबित केले असल्याचे विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये ठेवलेला बॉम्ब हा सुद्धा असाच कोणी चालकामार्फत दिला आहे का ? याची कसून चौकशी पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने एसटीचे काही चालक अनधिकृतपणे सामानाची ने आण करण्याचे काम करत असल्याची बाब समोर आली आहे.