रायगड - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव तालुक्यातील वडपाले येथे एस.टी. बसला भीषण आग लागण्याची घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या बसमध्ये ६० प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत प्रवाशांच्या सर्व साहित्यासह एसटी बस जळुन खाक झाली आहे.
परळ येथून रातराणी एसटी बस ६० प्रवाशांना घेऊन चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे निघाली होती. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एसटी बस माणगाव तालुक्यातील वडपाले येथे आली असता बसने अचानक पेट घेतला. एसटी बसला आग लागताच चालकाने व वाहकाने त्वरित प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले व स्वतः ही बाहेर पडले. प्रवासी उतरल्यानंतर बसने पेट घेऊन पूर्ण जळाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मुंबई परळ येथून प्रवासी सावर्डे येथे बसने निघाले होते. गणेशोत्सव आणि आज रविवार असल्याने काल (शनिवारी) रात्रीच्या बसने प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये चाकरमान्यांचा मोठा समावेश आहे. गणेशोत्सव असल्याने उत्सवासाठी लागणारे सर्व सामान घेऊन ते घरी जात होते. मात्र, एसटी बसला लागलेल्या आगीमुळे चाकरमान्यांचा जीव वाचला पण साहित्याची राखरांगोळी झाली आहे.