रायगड - जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणातफटका बसला आहे. या वादळामुळे वीज वितरण कंपनीच्या नुकसानी सोबतच मोबाईल कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे वीजचे खांब पडून वीज पूरवठा खंडित झाल्याने आयडिया, जिओ, व्होडाफोन, एअरटेल यासर्वच कंपनीचे मोबाईल नेटवर्क बंद पडले होते. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अशावेळी बीएसएनएल कंपनीने पुढाकार घेतला आहे. बीएसएनएल कंपनीने आपले नेटवर्क हे आयडिया, जिओ, व्होडाफोन, एअरटेल या ग्राहकांसाठी वापरण्यास मुभा दिली आहे. बीएसएनएलचे ज्युनियर टेलिकॉम इंजिनियर एस. पी. कोळी यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे आता वादळाच्या संकटात बीएसएनएलने कनेक्टिंग इंडिया हे आपले घोषवाक्य सार्थ करून दाखवले आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या अशा आपत्ती काळात ग्राहकांची ही गैरसोय टाळण्यासाठी बीएसएनएल कंपनीने पुढाकार घेऊन आपले नेटवर्क इतर कंपन्यासाठी खुले केले आहे. इतर कोणत्याही कंपनीच्या ग्राहकांना बीएसएनलचे नेटवर्क वापरता येणार आहे. यासाठी जिओ, आयडिया, व्होडाफोन, एअरटेल या कंपनीच्या नेटवर्क धारकांनी आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्क सेटिंगमध्ये जाऊन मॅन्युल सेटिंग करून बीएसएनएल नेटवर्क सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला नेटवर्क उपलब्ध होऊन कॉलिंग, मेसेजिंग सेवा उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती कोळी यांनी दिली आहे.