रायगड - पोलीस भरती प्रक्रियेतील बदल अन्यायकारक असून त्यामुळे सर्वसामान्य उमेदवारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप रायगड जिल्हा भारिप बहूजन महासंघाच्यावतीने करण्यात आला. भारिपने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत याचा निषेध नोंदवला आहे. जुन्या प्रक्रियेनुसार पोलीस भरती करण्यात यावी अशी मागणी यावेळी भारिपने केली.
महाराष्ट्र सरकारने १८ जानेवारी २०१९ला परिपत्रकारद्वारे पोलीस भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. त्यामध्ये मैदानी चाचणी अगोदर लेखी घेण्यात येणार आहे. मैदानी चाचणीत गुण शंभर वरून ५० करण्यात आले आहेत. ऐन पोलीस भरतीच्यावेळी सरकारने भरती प्रक्रियेत केलेला बदल हा भरतीची तयारी करणार्या तरुणांवर अन्यायकारक असल्याचे भारिपचे म्हणणे आहे.
पोलीस विभागात मागील ५ वर्षात रिक्त पदाव्यतिरिक्त नवीन पदांची भरती केली नाही. ग्रामीण भागात सुशिक्षीत प्रमाण वाढलेले आहे. ग्रामीण भागातील तरुण मागील ५ वर्षापासून पोलीस भरतीची तयारी जून्या भरती प्रक्रियेनुसार करत आहेत. जुन्या प्रक्रियेनुसार सुरुवातीला मैदानी चाचणी घेतली जाते. त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात असे. नवीन बदलानुसार भरती घेतल्यास मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होणार असल्याची भीती यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.