रायगड - प्रेम प्रकरणाला घरच्यांनी नकार दिल्याच्या घटना आपण वाचल्या असतील. मात्र, प्रेमविवाहाला कुटुंबाची परवानगी मिळ्यानंतर नवऱ्या मुलाने ऐनवळी लग्नास नकार दिल्याचा प्रकार रायगडमध्ये समोर आला आहे. लग्न ठरल्यावर मुलाने लग्नास नकार दिल्याचा राग धरून वधूकडील मंडळींनी नवऱ्यामुलाच्या भावाची हत्या केल्याची घटना पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
पोयनाडमधील एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण सुरू होते. त्यानंतर घरच्यांनी लग्नाची परवानगीही दिली. मात्र नवऱ्यामुलाने लग्न करण्यास टाळाटाळ केली. मुलीच्या घरच्यांनी त्याला समजवण्यासाठी रविवारी 11 ऑक्टोबर रोजी पेझारी येथे बोलावले. मात्र, बोलणी फिस्कटल्याने नवऱ्यामुलासह त्याच्या भावालानऊ जणांनी हाता बुक्क्याने मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने नवऱ्यामुलाच्या भावाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली असून चार जणांचा शोध सुरू आहे. पाच आरोपींना अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.