रायगड - मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील जागेवर आमदार रवींद्र वायकर यांनी अन्वय नाईक यांच्यासोबत 19 बंगले बांधून घोटाळा केला आहे. याबाबत 2005पासूनचे सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी रायगड यांना दिले आहेत. मात्र अद्यापही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे वायकर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब जे लवकरच जेलमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही बंगला पाडला जाणार आहे आणि आता रवींद्र वायकर यांचा नंबर आहे, असे सोमैया यांनी म्हटले आहे. कोर्लई कथित जमीन घोटाळा चौकशीबाबत आज 29 जून रोजी सोमैया यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'प्रशासनाकडे पुरावा दिला'
मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे मालमत्ता आहे. मृत अन्वय नाईक यांच्याकडून ही मालमत्ता घेण्यात आलेली आहे. या जमिनीवर रवींद्र वायकर आणि अनव्य नाईक यांनी 19 बंगले बांधले आहेत. याबाबत कागदपत्रे आणि पुरावा हा प्रशासनाकडे दिला आहे. मात्र अद्यापही याबाबत जिल्हाधिकारी यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेतली असून वायकर यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
'अनिल परब, मिलिंद नार्वेकर आता रवींद्र वायकर यांचा नंबर'
राज्याचे परिवहन मंत्री यांनीही घोटाळा केला असून लवकरच त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुरुड येथे सीआरझेड उल्लंघन करून बंगला बांधला आहे. नार्वेकर यांचा हा बंगलाही लवकरच पाडला जाणार आहे. तर कोर्लई जमीन घोटाळ्याबाबत वायकर यांचा आता नंबर असल्याचे सोमैया यांनी आपल्या प्रतिक्रियेतून इशारा दिला आहे.