रायगड - जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्व उमेदवार सभा, प्रचारात गुंतलेले आहेत. अद्यापपर्यंत पक्षाचे उमेदवार नेते, कार्यकर्ते हे प्रचार करीत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १७, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची १८ तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १९ एप्रिलला रायगडात सभा होणार आहे. या दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभेनंतर निवडणुकीला रंग चढणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचार सभेसाठी जिल्ह्यात येत आहेत. १७ एप्रिलला माणगाव येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. ही सभा १८ एप्रिलला अलिबागमध्ये होणार आहे. तर १९ एप्रिलला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा महाड येथे होणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार व राज ठाकरे या दिग्गज नेत्यांच्या सभा जिल्ह्यात होणार असल्याने हे नेते काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसला तरी 'मोदी हटाव' या भूमिकेतून ते प्रचार करीत आहेत. त्यामुळे त्याच्या सभेचा फायदा हा सुनील तटकरे यांना होईल, असे चित्र असले तरी तो कितपत होणार आहे. हे येणारा काळच ठरवेल. त्यामुळे १७ ते १९ एप्रिल दरम्यान दिग्गज नेत्यांची प्रचार सभा असल्याने त्या त्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.