रायगड - केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ३० वर्षात एकदाही मतदान केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. तीस वर्षात बोटाला शाई न लावणाऱ्या व्यक्तीला मत का द्यायचे असा सवालही त्यांनी केला. ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चिपळूणचे आमदार भास्कर जाधव आले होते. त्यावेळी घेतलेल्या मेळाव्यात केलेल्या भाषणात त्यांनी गीते यांच्यावर तोफ डागली. मोदी लाट असतानाही २०१४ मध्ये अनंत गीते हे अवघ्या २ हजार १०० मताने निवडून आल्याचे आमदार जाधव यावेळी म्हणाले.
भास्कर जाधव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. त्यामुळे देशात लोकशाही पद्धतीने मतदान करून सर्वाना मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मत विकासाला असे सांगत असतात. मात्र सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले व केंद्रात मंत्रिपद भूषविणारे अनंत गीते यांनी तीस वर्षात एकदाही आपल्या बोटाला शाई लावून मतदान केलेले नाही.
पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, अनंत गीते हे गुहागर, दापोली येथील भाषणात सांगतात की रायगडमध्ये मी ५० हजार मताधिक्याने निवडणून येईल. पण येथील लोकांना ते मला जरा सांभाळा असे सांगत आहेत. त्यामुळे ते रायगडात एक तर गुहागर, दापोलीत वेगळे बोलत आहे. तसेच यावेळी माझी शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहनही करीत असल्याची टीकाही जाधव यांनी गीतेंवर केली.