रायगड- 'बेटी बचाव, बेटी पढाव' जनजागृती कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात होणार होती. यासाठी महिला बाल कल्याण मार्फत अंगणवाडी सेविका 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाल्या होत्या. मात्र, पालकमंत्री तटकरे या कार्यक्रमाला झेंडा न दाखविताच बैठकीला गेल्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना बैठक संपेपर्यंत ताटकळत बसावे लागले. 20 ते 26 जानेवारी या दरम्यान बेटी बचाव, बेटी पढाव अतंर्गत जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा- शिर्डी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, दुपारी २ वाजता बैठक
मुलींचे जन्मदर वाढण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची माहिती गावागावात पोहोचविण्यासाठी 'बेटी बचाव, बेटी पढाव' कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्फत एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना विभागातर्फे जिल्ह्यात 20 ते 26 जानेवारी दरम्यान राबविण्यात येत आहे. या जनजागृती कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर अंगणवाडी सेविका जाऊन महिलांना, मुलींना भेटून बेटी बचाव, बेटी पढावबाबत जनजागृती करून गावागावात, शहरात रॅली काढणार आहेत.
बेटी बचाव, बेटी पढाव जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात अदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून आणि शपथ घेऊन होणार होते. यासाठी अंगणवाडी सेविका दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्या होत्या. मात्र, अदिती तटकरे ह्या जिल्हाधिकारी कार्यलयात दाखल झाल्यानंतर त्वरित जिल्हा नियोजन बैठकीला गेल्या. त्यामुळे बेटी बचाव, बेटी पढाव कार्यक्रमासाठी आलेल्या अंगणवाडी सेविकांना बैठक संपेपर्यत ताटकळत बसावे लागले आहे.
अंगणवाडी सेविकांना ताटकळत बसावे लागल्याने त्यांनी स्वतःच शपथ घेऊन कार्यक्रम आटोपता घेतला. जिल्हाधिकारी प्रशासनानेही याबाबत पालकमंत्री यांना आधी माहिती देणे अपेक्षित असताना तशी माहिती न दिल्याने अंगणवाडी सेविकांना मात्र ताटकळत बसावे लागले. माझी कन्या भाग्यश्री योजनेत रायगड जिल्ह्यातील 107 जणांना लाभ मिळाला असून अलिबाग तालुक्यतील 45 कुटुंबानी सर्वधिक लाभ घेतला आहे. शासनातर्फे 107 जणांना प्रत्येकी 25 हजारांचे फिक्स डिपॉझिट मुलींच्या नावे जमा करण्यात आलेली आहे. अशी माहिती प्रकल्प अधिकारी सुचिता घरत यांनी यावेळी दिली.